
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली (चामोर्शी ),दि.१० नोव्हेंबर: मानवी वस्तीजवळ आढळलेल्या अजगर सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडत चामोर्शी येथील सर्पमित्र प्रथम तुमपल्लीवार यांनी एका मुक्या जीवाला जीवदान दिले. त्यांच्या या धाडसी आणि पर्यावरणपूरक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
चामोर्शी येथे अजगर साप आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्र प्रथम तुमपल्लीवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखत त्यांनी अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर त्याला योग्य नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगलात सुरक्षितपणे सोडून दिले.

साप दिसताच अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. मात्र, प्रत्येक सापाला मारणे हा पर्याय नसून त्याचे संरक्षण करणे आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे आहे. सर्पमित्र प्रथम तुमपल्लीवार यांनी केलेल्या या कार्यातून वन्यजीव संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.
एका मुक्या जीवाला जीवदान देत निसर्गसंवर्धनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रथम तुमपल्लीवार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सापांना मारू नका, त्यांना सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊ द्या, हाच या उपक्रमाचा संदेश आहे.

