
गरीब व गरजू नागरिकांची घरकुले रखडली; तहसीलदारांकडून रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश

जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली:
चामोर्शी तालुक्यातील वाघोली रेती डेपोमधून शासनाला पैसे भरून रेती बुकिंग केलेल्या नागरिकांना अद्याप रेती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गरीब व गरजू नागरिकांच्या घरबांधकामांना मोठा फटका बसत असून, प्रशासनाच्या रेती वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी शिवसेना चामोर्शी शहरप्रमुख राजु धोडरे यांनी तहसीलदारांकडे अर्ज करून रेती बुकिंग केलेल्या नागरिकांना तातडीने रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या १ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निर्देशांचाही संदर्भ देण्यात आला आहे.
तहसीलदार चामोर्शी यांनी संबंधित पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, चामोर्शी, घोट व आष्टी परिसरातील काही नागरिकांनी स्वतःच्या घरबांधकामासाठी शासननिर्मित रेती डेपोमधून रेती बुकिंग केली आहे. मात्र, रेती डेपो धारकांकडून रेती उपलब्ध करून न दिल्याने गरीब व गरजू नागरिकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट राहिले आहे.
विशेषतः गरीब व गरजू शेतकरी नागरिकांचा विचार करून त्यांना बुकिंग केलेली रेती उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. रेती उपलब्ध करून न दिल्यास तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे सादर करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शासनाला रक्कम भरूनही रेती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. रेती बुकिंग करून पैसे भरलेल्या नागरिकांना त्यांची रेती प्रत्यक्षात कधी मिळणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बुकिंग केलेल्या सर्व पात्र नागरिकांना तातडीने रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

