
गडचिरोली–छत्तीसगड मार्गावरील खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी..

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड राज्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० (NH-930) वरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पवन राघोजी गेडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता खराब व धोकादायक झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून अपघाताचा धोकाही वाढला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड राज्याकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजविणे, खराब झालेल्या भागाची दुरुस्ती करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी पवन गेडाम यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हाप्रमुख पवन राघोजी गेडाम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांनाही देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देतांना गडचिरोली लोकसभा प्रमुख महेश केदारी, सहसंपर्क प्रमुख डॉ. बनसोड, जिल्हाप्रमुख पवन गेडाम, संघटक नंदू भाऊ कुंभरे, उपजिल्हाप्रमुख, अतुल नैताम, पप्पू शेख शहर प्रमुख, युवासेना शहर प्रमुख प्रफुल्ल कोसे, चेतन उरकुडे युवासेना उपजिल्हाधिकारी, अमोल कुळमेथे, माजी सरपंच तुषार मडावी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

