
हजारो भाविकांची उपस्थिती; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वैनगंगा तीर दुमदुमला
चामोर्शी, दि. २४ ऑगस्ट : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडादेव येथे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर भव्य महागंगा आरती सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सायंकाळी ५ वाजता झालेल्या या महाआरतीने संपूर्ण मार्कंडादेव परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.
मुख्यमंत्र्यांचे OSD अनिरुद्ध पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शितल बलराम सोमनाणी यांच्या हस्ते विधिवत महागंगा आरती करण्यात आली.

यावेळी काशी येथील महाराज, भांडेकर महाराज, रामु महाराज व पांडे महाराज यांच्या मंत्रोच्चाराने वैनगंगा तीर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला. घंटानाद, मंत्रघोष, फटाक्यांची आतषबाजी आणि भाविकांच्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण अक्षरशः दुमदुमून गेले.
श्रावण सोमवार आणि भगवान शिवभक्तीसाठी विशेष महत्त्व असलेल्या या पवित्र दिवशी महागंगा आरतीचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील विविध गावांतून हजारो भाविक मार्कंडादेव येथे दाखल झाले होते. भाविकांनी वैनगंगा नदीचे पूजन करून महाआरतीत श्रद्धेने सहभाग घेतला. आरतीच्या वेळी नदीच्या तीरावर प्रज्वलित झालेल्या असंख्य दीपज्योतींमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला. हा मनोहारी आणि भक्तिमय क्षण उपस्थित भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.
धर्म, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम
श्री मार्कंडेश्वर देवस्थानचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता, महागंगा आरतीसारख्या उपक्रमांमुळे मार्कंडादेवच्या धार्मिक परंपरेला अधिक बळ मिळत असून परिसरातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळत आहे. वैनगंगेच्या पवित्र तीरावर पार पडलेल्या या सोहळ्यामुळे भाविकांमध्ये श्रद्धा, एकात्मता आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
या महाआरतीस मार्कंडेश्वर देवस्थानचे गजानन भांडेकर, रामप्रसाद महाराज, मराठा धर्मशाळेचे कोंडुकवार, मार्कंडादेवचे सरपंच मोगरे, नगरपंचायत सभापती रोशनीताई वरघंटे,उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, भास्कर बुरे, आनंद भांडेकर, कविता किरमे, प्रतीक राठी, विनोद किरमे, रेवनाथ कुसराम, सुनील सोरते, नीरज रामानुजमवार, बावणे, लोमेश सातपुते, संजय खेडेकर, राजू मोगरे, भारत धोडरे यांच्यासह मार्कंडादेव येथील नागरिक व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
महाआरतीनंतर भाविकांनी ‘हर हर महादेव’, ‘जय श्री मार्कंडेश्वर’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला. हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महागंगा आरतीचा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अविस्मरणीय अनुभव ठरला.

