
अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना दिलासा; अन्नधान्यासह २०० स्टेशनरी किटचेही वाटप
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २१ॶॉगस्ट : भामरागड तालुक्यात जुलैअखेर आणि ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत बाधित झालेल्या ५०० कुटुंबांना आज जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करून मदतीचा हात देण्यात आला. तहसील प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र ठरलेल्या कुटुंबांना खासगी संस्थेच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली.

अतिवृष्टीमुळे भामरागड परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबांचे अन्नधान्य, घरगुती साहित्य व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले. पूरपरिस्थितीच्या काळात प्रशासनाने तत्काळ मदतकार्य राबवत सुमारे ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली होती.
पूर ओसरल्यानंतर तहसील प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार मदतीसाठी ५०० कुटुंबांची निवड करण्यात आली. या कुटुंबांना देण्यात आलेल्या किटमध्ये तांदूळ, गहू, तूरडाळ, पोहे, साखर, खाद्यतेल, मीठ, मसाले, साबण, केसांचे तेल आणि ब्लँकेट आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांसाठी २०० स्टेशनरी किटचेही वाटप करण्यात आले.
पूरग्रस्त कुटुंबांना संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मोठा हातभार लागणार आहे. प्रशासनाच्या मदतकार्याला खासगी संस्थेच्या सहकार्याची जोड मिळाल्याने पूरबाधित नागरिकांना दिलासा मिळाला.
यावेळी तहसीलदार किशोर बागडे, नायब तहसीलदार राजीव निखत, तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच टाटा स्टील फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

