
रक्तदानातून आमदार रामदास मसराम यांना ५७व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली|देसाईगंज,दि.२१ ॶॉगस्ट : आमदार रामदास मसराम यांच्या ५७व्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा क्षेत्र व आमदार रामदास मसराम मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आमदार मसराम यांना ५७व्या वाढदिवसाच्या अनोख्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शुभेच्छा दिल्या.

या रक्तदान शिबिराचे विशेष आकर्षण ठरले ते धनपाल मिसाळ (वय ६०) आणि धनश्री मिसाळ (वय ५२) या दाम्पत्याचे रक्तदान. पन्नाशीनंतरही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत या दाम्पत्याने रक्तदान करून युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
यावेळी बोलताना धनपाल मिसाळ व धनश्री मिसाळ यांनी, “रक्तदानासाठी वयापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आपण दिलेले रक्त एखाद्याचे प्राण वाचवू शकते. त्यामुळे युवकांनी पुढे येऊन नियमित रक्तदान करावे,” असे आवाहन केले.
आमदारांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव न करता रक्तदानासारख्या जीवनदायी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ‘वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून साजरा करा’ हा विधायक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या प्रसंगी माजी सभापती परसराम टिकले, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, उपसभापती नितीनभाऊ राऊत, नगरसेवक तथा गटनेते विकास प्रधान, शालुताई दंडवते, आशा दहीवले, श्याम उईके, राधिका पत्रे, मंदा समर्थ, इलियास पठाण, फेमिदा पठाण, अरुण कुंभलवार, प्रकाश समर्थ तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर, सागर वाढई, तालुकाध्यक्ष अमर भरे, जितू चौधरी, लंकेश ढोरे, निलेश दुपारे यांच्यासह सर्व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
५७ रक्तदात्यांचे रक्तदान आणि मिसाळ दाम्पत्याचा प्रेरणादायी सहभाग यामुळे आमदार मसराम यांचा वाढदिवस सामाजिक संवेदनशीलतेचा आणि सेवाभावाचा आदर्श ठरला. आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदाते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

