
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी : अहेरी शहरातील इंदिरानगर बेघर कॉलनीची ओळख आता लवकरच बदलणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत दुसऱ्या DPR ची मंजूर यादी काल प्राप्त झाली असून, अहेरी शहरातील एकूण २७२ लाभार्थ्यांमध्ये बेघर कॉलनीतील तब्बल ४२ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.
प्रत्येक लाभार्थ्याला ₹२ लाख ५० हजारांचे अनुदान अहेरी नगर पंचायत मार्फत मिळणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या ४२ कुटुंबांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. बेघर कॉलनीतील घरांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. अनेक वर्षांपासून येथील नागरिक आपल्या हक्काच्या घरकुलासाठी संघर्ष करत होते.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, सुमारे दीड वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शहाणे साहेबांच्या उपस्थितीत बेघर कॉलनीमध्ये बैठक घेऊन घरकुल योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच पात्र नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करण्यात आली.
त्यानंतर घरकुलांना मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, काल जाहीर झालेल्या मंजूर यादीत बेघर कॉलनीतील तब्बल ४२ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून पाहिलेले हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याने बेघर कॉलनीत आनंदाचे वातावरण आहे.

