
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
गडचिरोली | दि. २० ऑगस्ट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील शिवसैनिक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वाढदिवसानिमित्त सकाळी ११ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महिला रुग्णालय, गडचिरोली येथे “मायेचा घास” उपक्रम राबवून रुग्णांना मदतीचा हात देण्यात येणार आहे.

दुपारी १ वाजता ग्रामीण रुग्णालय, वडसा येथे रुग्णांना फळवाटप, तर दुपारी ३ वाजता गोशाळेत गोमातेची सेवा व गाईंना चारा अर्पण करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, रुग्णसेवा आणि गोसेवा अशा विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान, सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजल्यापासून स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सर्व कार्यक्रमांना शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.

