
तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी; गरजूंना औषधे व मोफत चष्म्यांचे वाटप
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/देसाईगंज| दि. २० ऑगस्ट : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज तसेच आमदार रामदास मसराम मित्रपरिवाराच्या वतीने कोरेगाव येथे भव्य महाआरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिर उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


शिबिरात हृदयरोग, हाडांचे विकार, स्त्रीरोग, नेत्ररोग यांसह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. गरजू रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले, तर नेत्र तपासणीनंतर चष्म्याची आवश्यकता असलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले.
यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार व तज्ज्ञ आरोग्यसेवा पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा स्वीकार न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासली पाहिजे. अशा सेवाभावी उपक्रमांमधून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम सातत्याने पुढे नेले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी दिनेशजी कुर्जेकर, कोरेगावच्या सरपंच मिमिता आळे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, जीवन पा. नाट, नितीन राऊत, डॉ. सत्यम गुप्ता, सुधाकरजी मडावी, नरहरी तुमराम, नरेंद्र गजपुरे, प्रशांत किलनाके, हंसराज लांडगे, काशिनाथ ताडे, धनपाल मिसार, उमेश बानूबाकोडे, मोतीराम राऊत, सौ. शालूताई दंडवते, सौ. मिमिताताई पेंदाम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

