
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरचीचा 800 मीटर ‘मुख्य रस्ता’ चाळणीच्या वाटेवर; झेडपी बांधकाम विभागाकडून हस्तांतरणात घोळ
कोरची नगरपंचायत हद्दीतील बस स्थानक ते कुरखेडा-कोरची-देवरी राष्ट्रीय महामार्ग टी पॉईंट पर्यंतचा 800 मीटर रस्ता पूर्णपणे उखडून चाळण झाला आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना चालणे तसेच दुचाकी व चारचाकी वाहने चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने या रस्त्याचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कुरखेडा-कोरची-बोटेकसा रा.मा. 315 ला जोडणारा कोरची पोचमार्ग ग्रामा 40 किमी 0/00 ते 0/800 म्हणजेच शहरातील बस स्थानक ते आरम शाळा टी पॉइंट पर्यंतचा 800 मीटर रस्ता नगर पंचायतीला हस्तांतरित केला आहे. तसेच जोडतराई ते कोचीनारा रस्ता ग्रामा 57 किमी 2/300 ते 5/100 एकूण 2.800 किमी रस्ताही नगर पंचायतीकडे दिला आहे.

मात्र प्रत्यक्षात कोचीनारा नाल्यापर्यंतचा रस्ता नगर पंचायतीला हस्तांतरित करणे अपेक्षित असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाने चुकीने ग्रामपंचायत हद्दीपर्यंतच रस्ता हस्तांतरित केला असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता उर्वरित हद्दीतील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्याची दुरुस्ती कोण करणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे म्हणणे आहे की, बस स्थानक ते टी पॉईंट हा 800 मीटर रस्ता नगर पंचायतीला हस्तांतरित केलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे नगर पंचायतीकडे हस्तांतरित केलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. ‘आमचा रस्ता नाही’ आणि ‘निधी नाही’ या घोळात गेल्या 5 वर्षांपासून नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
नगर पंचायतीने जिल्हा परिषदेकडून रस्ते हस्तांतरित करून घेतले, मात्र त्यानंतर रस्ते दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता उखडून खड्डेमय झाला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करणे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हस्तांतरणातील चूक दुरुस्त करून कोचीनारा नाल्यापर्यंतचा संपूर्ण रस्ता नगर पंचायतीकडे वर्ग करावा व नगर पंचायतीने तातडीने या 800 मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी एकमुखी मागणी नागरिकांतून होत आहे.

