
नितेश गट्टीवार गडचिरोली, दि. २३ मार्च :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पाच व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. २५ व २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून निवड झालेल्या व्यक्तींमध्ये मनोहर माधवराव हेपट (गडचिरोली), केशव रामधन चव्हाण, सूर्यप्रकाश सरस्वती गजानन गभने (देसाईगंज), विजय श्रीरंग शेंडे तसेच तुळशीराम तुलाराम उंदीरवाडे यांचा समावेश आहे. या सर्वांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास मोलाचा हातभार लावला आहे.

व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्स्थापना या क्षेत्रांत प्रभावी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सन १९९८-९९ पासून सुरू करण्यात आली आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीतील पुरस्कारांसाठी राज्यस्तरीय निवड समितीच्या शिफारशीवरून या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ तसेच आर्थिक पारितोषिकाचा समावेश असून, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील निवड झालेल्या सर्व व्यक्तींचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

