
मानधन थकबाकीवर पेसा कंत्राटी शिक्षकांचा संताप; सरकारला इशारा – कामबंद आंदोलनाचा बिगुल
गडचिरोली : पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांना शैक्षणिक सत्र 2024-25 पासून, विशेषतः मार्च महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. या थकबाकीमुळे शिक्षक वर्गात तीव्र नाराजी पसरली असून, शिक्षकांनी अखेर कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांमधील पेसा कंत्राटी शिक्षकांनी एकत्र येत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन सादर केले. यावेळी शिक्षकांनी आपली वेदना व अडचणी स्पष्टपणे मांडल्या. “महागाई वाढली, घर चालवणे अवघड झाले, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही होत नाही” अशी व्यथा अनेक शिक्षकांनी मांडली.

डॉ. देवराव होळी यांनी निवेदन स्वीकारून उपस्थित शिक्षकांना दिलासा दिला. त्यांनी स्पष्ट केले की हा प्रश्न न्याय्य असून तो तातडीने मार्गी लावण्यासाठी ते स्वतः मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना लेखी पत्रव्यवहार करतील व आवश्यक असल्यास प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा करतील. “शिक्षकांचे मानधन हा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. शासनाने दुर्लक्ष करणे योग्य नाही” असेही डॉ. होळी यांनी नमूद केले.
शिक्षकांनी शासनाकडे मागणी केली की, तात्काळ थकबाकी मानधनाचा निकाल लावून पुढे वेळेवर मानधन देण्यात यावे. अन्यथा त्यांना कामबंद आंदोलन, धरणे, रस्तारोको अशा टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
या निवेदनावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शिक्षक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंत्राटी शिक्षकांनी मांडल्या, माजी आमदार डॉ. होळींकडे आपल्या व्यथा.

