
महेंद्र ब्राह्मणवाडे यांची उपोषणस्थळी भेट; शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्षात ठाम साथ देण्याचे आश्वासन

नितेश गट्टीवार |गडचिरोली : गुरवळा, राखी, शिरपूर व हिरापूर येथील प्रस्तावित विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला भेट देत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मागण्या, समस्या आणि भावना जाणून घेत त्यांनी या लढ्याला ठाम पाठिंबा दर्शविला.
‘शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण झाल्याशिवाय विकासाला पूर्णत्व नाही!’

प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असल्याने संबंधित गावांतील शेतकऱ्यांसमोर शेती, उपजीविका आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या जमिनींवरच अनेक शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. कोणताही विकासप्रकल्प राबविताना शेतकऱ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होता कामा नये. शेतकऱ्यांची संमती, त्यांच्या हिताचे संरक्षण आणि जमिनीचा योग्य मोबदला या बाबींना प्राधान्य दिले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आपण त्यांच्या संघर्षात सदैव सोबत राहू, असे आश्वासन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी दिले.
जमीन अधिग्रहणाचा प्रश्न हा केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून तो शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा, कुटुंबाच्या भविष्याचा आणि त्यांच्या हक्कांचा प्रश्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, दिवाकर निसार, गुरवळा येथील सरपंच अनिल कोठारे, विकास जेंगठे, तात्याजी चिचघरे, गायक विजय शेंडे यांच्यासह शेतकरी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते शेतकरी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्तावित विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नावर शेतकरी संघर्ष कृती समितीने सुरू केलेल्या बेमुदत साखळी उपोषणामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

