
न्युज जागर नेटवर्क

नागपूर विभाग पदवीधर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी नागपूर आणि अमरावती विभागात मतदानाचा उत्साह दिसून आला. नागपुरात भाजपने बूथवर ताकद पणाला लावली, तर काँग्रेसचे नेते-कार्यकर्तेही सरसावले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत भाजपची यंत्रणा सक्रिय होती. विशेष म्हणजे, दिवसभर एकमेकांविरुद्ध राबलेल्या कार्यकर्त्यांनी मतदानानंतर बूथवर एकत्र चहापान केले. गेल्या निवडणुकीत ६४.३८ टक्के मतदान झाले होते. यावेळीही हा टप्पा ओलांडण्यासाठी राजकीय कार्यकर्ते आटापिटा करत होते.
३८ उमेदवार रिंगणात

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात महायुतीचे सुधाकर कोहळे आणि महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांच्यासह शिक्षक भारतीचे अतुल देशमुख व अपक्ष नितेश कऱ्हाळे यांच्यात प्रमुख लढत आहे. एकूण ३८ उमेदवार रिंगणात होते. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे, फोनद्वारे संपर्क साधणे आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरातील आठ ते दहा बूथवर भेटी देत आढावा घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाल येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये, तर फडणवीस यांनी रविनगर येथील महापालिका शाळेतील केंद्रावर मतदान केले.
सहाही जिल्ह्यामध्ये बूथपातळीवरील यंत्रणा सक्रिय काँग्रेसकडून खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अनीस अहमद, राजेंद्र मुळक, आमदार विकास ठाकरे, गिरीश पांडव, अतुल लोंढे आणि प्रफुल्ल गुडधे यांनी मोर्चा सांभाळला. अभिजित वंजारी आणि सुधाकर कोहळे यांनीही विविध बूथवर भेटी देत कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांत बूथपातळीवरील यंत्रणा सक्रिय होती.
फडणवीस, गडकरींचे सकाळीच मतदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविनगर येथील महापालिका शाळेतील केंद्रावर, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबीयांसह महाल येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मतदान केले. यावेळी सुधाकर कोहळे आणि माघार घेतलेले माजी आमदार अनिल सोलेही गडकरींसोबत होते.
अमरावतीत २६ उमेदवारांची धाकधूक
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात २६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांतील ८१ केंद्रांवर मतदान झाले. सकाळच्या संथ सुरुवातीनंतर दुपारी १२ वाजल्यापासून केंद्रांवर गर्दी वाढली. महायुती, महाविकास आघाडी, शिक्षक भारती आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सक्रिय होते. अमरावतीतून इतर जिल्ह्यांतील मतदानाचा आढावा घेण्यासाठी नेत्यांची मोबाइलवरून धावपळ सुरू होती. शिंदेसेनेचे किरण सरनाईक, काँग्रेसच्या अदिती पोहरे, प्रा. दिलीप कडू, संगीता शिंदे-बोंडे, श्रीकांत देशपांडे, शेखर भोयर, अविनाश बोर्डे, शिक्षक भारतीचे सुरेश देवकर, दत्तात्रय लहाने आणि प्रा. प्रशांत विघे यांच्या विजय-पराजयाचे अंदाज रंगले. मात्र, चर्चेतील आघाडी म्हणजे विजयाची खात्री नव्हे! कुणाचे गणित जमले, कुणाचा हिशेब चुकला, याचा निकाल २७ ऑक्टोबरलाच लागणार. तोवर २६ उमेदवारांचे ठोके वाढलेलेच राहणार.

