
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी

अहेरी : खांदला ते चिरेपल्ली आणि चिरेपल्ली ते अहेरी तालुक्यातील आलापल्लीपर्यंतचा सुमारे 28 किमी मुख्य रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी चिरेपल्ली, पत्तीगाव, कोत्तागुडम आणि मारणेली येथील ग्रामस्थांनी २१ ऑक्टोबरपासून अहेरी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात गावातील महिला, लहान मुले आणि नागरिक आपल्या गावापासून तब्बल 28 किमीचा प्रवास करून सहभागी झाले आहेत. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असूनही शासनाकडून अद्याप ठोस प्रतिसाद मिळालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, *माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम* यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगत, “जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मीसुद्धा इथून हटणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
ग्रामस्थांच्या हक्काच्या रस्त्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला *भाग्यश्रीताई आत्राम* यांनी दिलेला पाठिंबा हा त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा ठरला आहे. आता शासन या मागणीची दखल घेऊन रस्त्याच्या कामाला कधी सुरुवात करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यावेळी सर्व गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

