
पोंभुर्णा–सुशी मार्गावर निकृष्ट कामाचा आरोप; रात्रीचा प्रवास नागरिकांना धोकादायक!
चुकीच्या डायव्हर्शनमुळे वाहनधारक त्रस्त; संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी

जिल्हा प्रतिनिधी! चेतन कामडे..
पोंभुर्णा : पोंभुर्णा–सुशी मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते बांधकामामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असताना योग्य डायव्हर्शनची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनांना मार्गक्रमण करणेही कठीण होत असल्याची तक्रार वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

सुशी गावा समोर दोन ठिकाणी करण्यात आलेले ड्रायव्हर्शन योग्य पद्धतीने न केल्याने रात्रीच्या वेळी फोरव्हीलर वाहनांना मार्गक्रमण करणे कठीण झाले. परिणामी काही काळ रस्ता वाहतुकीसाठी जवळपास बंदच राहिल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम, उखडलेली माती आणि खडबडीत पृष्ठभाग दिसून येत आहे. छायाचित्रांमधूनही रस्त्याची दुरवस्था स्पष्टपणे दिसत असून, रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होऊ शकते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जेएसबी व मुरूमऐवजी मातीचा भराव?
संबंधित रस्त्याच्या बांधकामात जेएसबी आणि मुरूमाचा योग्य भराव न करता भिसी माती व साधी माती टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आरोपांची संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
अधिकारी व कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह ?
रस्त्याचे काम सुरू असताना वाहनधारकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी योग्य डायव्हर्शन, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा सूचना असणे गरजेचे आहे. मात्र, पोंभुर्णा–सुशी मार्गावर या व्यवस्थेच्या अभावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.
संबंधित बांधकामाची गुणवत्ता तपासून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच रस्त्याचे काम दर्जेदार साहित्य वापरून तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
आता संबंधित बांधकाम विभाग या तक्रारींची दखल घेऊन रस्त्याची पाहणी करतो का आणि वाहनधारकांचा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करतो का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
… News Jagar Chandrapur District…

