
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा–आसरअल्ली–सोमनपल्ली–कोपेला–किष्टयापल्ली–रमेशगुडम–कोळी या मार्गावरील गावांसाठी नियमित एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या मार्गावरील गावांमधून विद्यार्थ्यांसह शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र या भागात पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत असून, नागरिकांना शासकीय कार्यालये, दवाखाने तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने बससेवा सुरू करण्यास अनुकूल परिस्थिती असून, नियमित एसटी बससेवा सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सिरोंचा–आसरअल्ली–सोमनपल्ली–कोपेला–किष्टयापल्ली–रमेशगुडम–कोळी या मार्गावर नियमित एसटी बससेवा सुरू करण्यासाठी संबंधित परिवहन विभागाकडे आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी बानय्या जनगाम यांनी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे केली आहे.
या बससेवेमुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होऊन विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला प्रवासाचा मोठा लाभ मिळेल, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम,नगरसेवक जगदिश रालाबंडीवार, ग्रामपंचायत सिरकोंडा सरपंच लक्ष्मण गावडे, दुर्गेश लंबाडी, रामचंद्रू दुर्गमसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व करायकर्ते उपस्थित होते.


