kadhhyancha vadhdivas

ओमकार नगरातील खड्ड्याला हार घालून केक कापत बहुजन समाज पार्टीचा तीव्र निषेध

नागपूर
एक वर्षापूर्वी वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध होऊनही ओमकार नगर परिसरातील रस्त्यावरील खड्डा आजही जशाचा तसाच असल्याने बहुजन समाज पार्टी नागपूर शहराच्या वतीने संतप्त आणि अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. वर्षभर खड्डा बुजवला नाही, म्हणून कार्यकर्त्यांनी चक्क त्या खड्ड्याचा एक वर्षाचा वाढदिवस साजरा केला.
बहुजन समाज पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, दक्षिण-पश्चिम विधानसभा अध्यक्ष सौरभ जामगडे, दक्षिण सचिव पियुष मेश्राम, कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

यावेळी खड्ड्याला हार घालण्यात आला, केक कापण्यात आला आणि उपस्थित नागरिकांना केक वाटून खाऊ घालण्यात आला. टाळ्यांचा कडकडाट करत “खड्ड्याचा एक वर्षाचा वाढदिवस” साजरा करण्यात आला. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपरोधिक पद्धतीने वाढदिवसाचे गाणेही म्हटले.
मात्र, हा केवळ उपरोधिक कार्यक्रम नव्हता; या खड्ड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा संताप यावेळी अक्षरशः उफाळून आला. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. अनेक नागरिकांनी या खड्ड्यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास, वाहनांचे नुकसान आणि अपघाताचा निर्माण झालेला धोका याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
विशेष म्हणजे हा खड्डा सिग्नलजवळच असून, सिग्नलवर वाहने थांबतात आणि पुन्हा सुरू करताना वाहनचालकांना या खड्ड्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याचा धोका निर्माण होतो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात अनेक जण घसरून पडले असून अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत.
“वर्तमानपत्रात बातमी आली, नागरिकांनी तक्रारी केल्या, वर्षभराचा कालावधी उलटला; पण महानगरपालिकेला हा खड्डा दिसत नाही. मग प्रशासनाला जागे करण्यासाठी आता खड्ड्याचा वाढदिवसच साजरा करावा लागणार का?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज या मार्गावरून हजारो वाहनांची ये-जा होते. सिग्नलवर थांबलेल्या वाहनांमध्ये अचानक खड्डा आल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण होतो. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी उपरोधिकपणे “बार बार दिन ये आए…NMC खड्ड्याचा वाढदिवस येत राहो…” अशा घोषणा देत टाळ्यांच्या गजरात निषेध नोंदवला. व त्याचा व्हीडीओ बनवून समाज पसार माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आल्याने शहरात चर्च होत आहे
बहुजन समाज पार्टीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, नागरिकांना रस्ते आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. वर्षभर एखादा खड्डा कायम ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
“आज आम्ही केक कापून खड्ड्याचा वाढदिवस साजरा केला आहे; पण पुढच्या वर्षी पुन्हा याच खड्ड्याचा वाढदिवस साजरा करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये. महानगरपालिकेने तातडीने हा खड्डा बुजवून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी,” अशी प्रतिक्रिया व मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली.
बहुजन समाज पार्टीच्या या आगळ्या वेगळ्या पद्धतीने खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्याने मात्र शहरात चर्चा होत आहे
एक वर्ष पूर्णपने खड्डा जशाचा तसा राहिल्यामुळे नागरिकांना झालेला त्रास लक्षात घेता आतातरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शहरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे वाढदिवस साजरे करण्यात येणार असा इशारा बसपा शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी दिला आहे.

