
सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि विकसित भारताचा संदेश देत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजन; मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी होणार

गडचिरोली | जिल्हा प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी, गडचिरोलीच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आज बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सेवा ज्योती यात्रा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यमुना हॉल, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सकाळी ६.३० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती राहणार आहे.

‘सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि विकसित भारत’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना आणि विकासकामांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रा. दिनेश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा, सुशासन आणि जनकल्याणाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सदस्य, सर्व मोर्चांचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, तसेच विविध शासकीय योजनांचे लाभार्थी आणि तालुकास्तरीय कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन
‘सेवा ज्योती यात्रा’च्या निमित्ताने गडचिरोलीत भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडणार असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांना या कार्यक्रमातून अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.या भव्य कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्या विनंतीने करण्यात आले असून, जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोलीत आज ‘सेवा ज्योती’चा प्रकाश; भाजपच्या या महासंमेलनातून संघटनशक्ती आणि जनसेवेचा नवा संदेश देण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

