
गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित १० तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली: भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी नागपूर येथील रामगिरी बंगल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विकासात्मक प्रश्नांवर चर्चा केली.
विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मांडण्यात आलेल्या विविध मुद्द्यांपैकी गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘गोंडवाना वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गडचिरोली जिल्ह्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आदिवासी ओळख लक्षात घेता या नामकरणामुळे जिल्ह्याच्या अस्मितेला योग्य स्थान मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. सध्या गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असून ते २०२४ मध्ये स्थापन झाले आहे.

यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित १० तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणीही माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली. दुष्काळाच्या निकषांबरोबरच संबंधित तालुक्यांमधील प्रत्यक्ष पिकांची व पाणीस्थितीची पाहणी करून शेतकरी व नागरिकांना आवश्यक दुष्काळी सवलती आणि मदत मिळावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने आरोग्य सुविधा, कृषी, पाणी, रोजगार, शिक्षण आणि आदिवासी भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी नमूद केले.

