
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली

चामोर्शी : आष्टी-चामोर्शी मार्गावर येनापूर येथील पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील तिघे जण जखमी झाल्याची घटना सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणसरी येथील ड्युटी आटोपून घरी परतत असताना येनापूर पेट्रोल पंपाजवळ संबंधित दुचाकीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. धडक एवढी तीव्र होती की, दोन्ही वाहनांवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापती झाल्या.

या अपघातात यशवंत उंदीरवाडे (वय २५, रा. आंबोली) हे जखमी झाले असून त्यांना तातडीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आदिनाथ सिडाम आणि खाडे (वय २४ वर्षे) यापैकी एकाला चंद्रपूर व एकाला चामोर्शी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात रवाना करण्यासाठी नागरिकांनी मदत केली.
दरम्यान, दोन दुचाकींची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच नेमके कारण समोर येणार असून, आष्टी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

