
यमुना लॉन्स येथे भव्य सोहळा; माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

गडचिरोली, दि. ७ ऑक्टोबर : भारतीय जनता पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने ‘जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या ब्रीदवाक्याला समर्पित २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त गडचिरोली शहरातील पोटेगाव रोडवरील यमुना लॉन्स येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ आणि ‘सेवा ज्योती यात्रा’ यांचे भव्य आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्मितीच्या भावनेने कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

यमुना लॉन्स येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या भूमिकेवर भर देण्यात आला. २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या संकल्पात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
शहरातून निघाली ‘सेवा ज्योती यात्रा’
सभेनंतर यमुना लॉन्स येथून रेड्डी गोडाऊन चौक आणि परिसरातून ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली. या पदयात्रेत विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी, माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
सेवेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत नेणे आणि समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहाशी जोडणे, हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘मोदींचा २५ वर्षांचा प्रवास म्हणजे त्यागाचा यज्ञ’ : दिनेश सूर्यवंशी
सभेला संबोधित करताना विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करताना सांगितले की, “मोदीजींचा २५ वर्षांचा प्रवास हा केवळ राजकीय प्रवास नसून त्याग, निष्ठा आणि समर्पित जनसेवेचा प्रवास आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान या प्रवासात त्यांनी राष्ट्र प्रथम या भावनेने काम केले.”
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यातही विकासाच्या विविध योजना पोहोचत असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हे भाजप कार्यकर्त्यांचे प्रमुख ध्येय असून, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील राहतील, असेही त्यांनी सांगितले.
२०४७ च्या विकसित भारताचा संकल्प
या कार्यक्रमातून ‘विकसित भारत’, ‘सेवा ज्योती यात्रा’ आणि ‘जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या तीन प्रमुख संकल्पांवर भर देण्यात आला. २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे, शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, सदानंद कुथे, प्रकाश गेडाम, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, शहराध्यक्ष तथा न.प. सभापती अनिल कुनघाडकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, भाजपा तालुका अध्यक्ष दतु सुत्रपवार, शहराध्यक्ष तथा न.प. सभापती सीमा कन्नमवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, सभापती, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोलीत आयोजित या कार्यक्रमातून सेवा, संघटन आणि विकसित भारताच्या संकल्पाचा संदेश देत भाजपने आपली संघटनात्मक उपस्थिती अधोरेखित केली.

