
पेरमिली (कोरेली खुर्द, ता. अहेरी):

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सध्या राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ या विशेष मोहिमेला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याच मोहिमेअंतर्गत अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पेरमिली अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र पेरमिली येथील कोरेली खुर्द गावात नुकतीच एक विशेष आरोग्य तपासणी मोहीम पार पडली.
या शिबिरात ३० वर्ष व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांच्या आरोग्याची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), तसेच ओरल कॅन्सर (तोंडचा कर्करोग) आणि ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) यांसारख्या गंभीर आजारांच्या लक्षणांची तपासणी करण्यात आली.

या आरोग्य तपासणी दरम्यान आरोग्य सेवक मयुर कोडापे यांनी सक्रिय सहभाग घेऊन सेवा बजावली. त्यांच्यासह आरोग्य पथकाच्या माध्यमातून या मोहिमेचा लाभ घेत एकूण ५२ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण होत असून, आजारांचे प्राथमिक अवस्थेतच निदान होण्यास मोठी मदत होत आहे.

