
मोबाईल कॉल न लागणे, इंटरनेटचा वेग मंदावणे आणि वारंवार नेटवर्क खंडित होण्याने नागरिक त्रस्त; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. ५ ऑक्टोबर :
गडचिरोली शहरातील BSNL मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवेच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले असून, या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने BSNL प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये BSNL चे नेटवर्क अत्यंत कमकुवत होत असून मोबाईल कॉल न लागणे, वारंवार कॉल ड्रॉप होणे, संभाषणामध्ये अडथळे येणे तसेच इंटरनेट सेवा अत्यंत धीम्या गतीने चालणे, अशा समस्यांना नागरिकांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, व्यापारी, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच ऑनलाइन व्यवहार व डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
गडचिरोली हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथे दूरसंचार सेवा सक्षम व सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, नेटवर्कच्या समस्येमुळे नागरिकांची गैरसोय होत असून BSNL प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने तांत्रिक पाहणी करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रमुख मागण्या
गडचिरोली शहरातील BSNL नेटवर्कची तातडीने सर्वसमावेशक तांत्रिक तपासणी करावी.
ज्या भागांमध्ये नेटवर्क सिग्नल कमी आहे, त्या ठिकाणी नेटवर्क क्षमता वाढवावी.
वारंवार बंद पडणारे किंवा तांत्रिक बिघाड असलेले मोबाईल टॉवर तातडीने दुरुस्त करावेत.
कॉल ड्रॉप व कॉल कनेक्टिव्हिटीच्या समस्या तातडीने दूर कराव्यात.
BSNL 4G इंटरनेट सेवेचा वेग व स्थिरता सुधारावी.
नेटवर्क कव्हरेजची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकतेनुसार अतिरिक्त तांत्रिक उपकरणे व पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात.
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या नेटवर्क तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी.
करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती व त्यासाठीची कालमर्यादा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला कळवावी.
निवेदनात पुढे, “नागरिकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनात्मक भूमिका घेईल,” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, हे निवेदन ५ ऑक्टोबर २०२६ रोजी BSNL कार्यालयात प्राप्त झाले असून, आता BSNL प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते आणि गडचिरोलीकरांना नेटवर्कच्या त्रासातून कधी दिलासा मिळतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

