
महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती; पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार

नागपूर, ५ ऑक्टोबर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे आजी-माजी प्रदेशाध्यक्ष, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत काँग्रेसकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, रोजगार, स्पर्धा परीक्षा, बेरोजगारी तसेच विविध मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा एकदा अभिजित वंजारी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. २०२० च्या निवडणुकीत वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव करून हा मतदारसंघ काँग्रेसकडे आणला होता. आगामी निवडणुकीतही हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीतील प्रमुख राजकीय लढत स्पष्ट झाली आहे. त्यामुळे नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अधिक चर्चेचा विषय ठरली आहे.
पदवीधरांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी, त्यांच्या अपेक्षांना दिशा देण्यासाठी आणि विधान परिषदेत त्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे काँग्रेस व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी सांगितले.

