korchi news

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली

कोरची
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सोमवारी (५ ऑक्टोबर) महसूल मंडळ कार्यालय, कोरची येथे फेरफार अदालत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन अडचणींचे निराकरण करण्यावर भर देण्यात आला. प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, जिवंत गाव नमुना सात-बारा मोहीम, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप, विद्यार्थ्यांना विविध शालेय दाखल्यांचे वाटप, वनहक्क दाव्यांची माहिती संकलन तसेच ई-पिक पाहणी आणि अॅग्रीस्टॅक अभियानाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत त्यांचा तातडीने निपटारा करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात आला.
‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत कोरची महसूल मंडळ स्तरावर आयोजित फेरफार अदालत यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी कोरची मंडळातील शेतकरी व नागरिकांसह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच महसूल सेवक उपस्थित होते.

