
गडचिरोली : आयटकचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन 27 सप्टेंबर 2026 रोजी क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके सभागृह, पंचायत समिती, गडचिरोली येथे उत्साहात पार पडले.
या अधिवेशनाला अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा संघटना, शालेय पोषण आहार संघटना, हातपंप कामगार संघटना, सफाई कामगार संघटना, इलेक्ट्रिक वर्कर फेडरेशन तसेच जि.प. कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील इतर कामगार संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिवेशनात विविध कर्मचारी व कामगार संघटनांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वेतन व मानधन, रोजगाराची सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, कामगारांचे हक्क व अधिकार, सेवा-सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत प्रतिनिधींनी आपली मते मांडली. संघटनात्मक विस्तार आणि जिल्ह्यातील कामगारांना अधिक प्रभावीपणे संघटित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर झालेल्या संघटनात्मक निर्णयानुसार कॉ. सचिन मोतकुरवार यांची आयटक गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
“अन्याय सहन करू नका, हक्कांसाठी संघटित व्हा!” — कॉ. सचिन मोतकुरवार
नवनिर्वाचित जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी जिल्ह्यातील कर्मचारी व कामगारांना कृतीशील आवाहन करताना म्हटले की,
“गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही कर्मचारी किंवा कामगारावर अन्याय होत असेल, वेतन किंवा मानधन मिळत नसेल, सेवा-सुरक्षा व इतर हक्कांपासून वंचित ठेवले जात असेल किंवा शासनाच्या नियमानुसार मिळणाऱ्या सुविधांचा लाभ मिळत नसेल, तर गप्प बसू नका. आपल्या प्रश्नाची माहिती आयटकपर्यंत पोहोचवा आणि तातडीने संघटनेशी संपर्क साधा.
आपल्या हक्कांसाठी एकट्याने लढण्यापेक्षा संघटितपणे आवाज उठविणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, कामगार, कंत्राटी कामगार आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिकांनी आयटकचे सदस्यत्व स्वीकारून संघटित व्हावे.
आपला प्रश्न आयटकपर्यंत पोहोचवा, संघटनेशी जोडा आणि आपल्या हक्कांसाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने संघटित संघर्ष उभा करा. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आयटक सातत्याने त्यांच्या सोबत उभी राहील.”
— कॉ. सचिन मोतकुरवार
जिल्हा कार्याध्यक्ष, आयटक, गडचिरोली

