
कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; धान-कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी सुरू
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या चामोर्शी तालुक्यात आता दुष्काळी परिस्थितीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

सहाय्यक कृषी अधिकारी प्रदीप मुंडे यांनी रविंद्रपूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर धर्मपूर येथील शेतांमध्ये जाऊन धान व कापूस पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेत पंचनाम्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली. तसेच शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध सवलती व मदतीबाबतही जनजागृती करण्यात आली.
शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची स्थिती, पावसाचा परिणाम आणि संभाव्य नुकसान याबाबत माहिती संकलित केली जात आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी पंचनाम्याचे काम काटेकोरपणे करण्यावर कृषी विभागाचा भर आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू असून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पंचनामे केले जात आहेत.
दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरू केलेल्या या पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची अपेक्षा वाढली असून, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याची शेती प्रत्यक्ष पाहणी करून योग्य नोंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

