
इमारत अपुरी, शिक्षकांचा अभाव, डेस्क-बेंच नाहीत; संरक्षक भिंतही गायब – CJPच्या School Visitमध्ये धक्कादायक वास्तव समोर
चामोर्शी : तालुक्यातील किष्ठापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे CJP गडचिरोलीच्या School Visit दरम्यान समोर आले. शाळेची इमारत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत अपुरी असल्याने जागेअभावी विद्यार्थ्यांना मंदिरात बसवून शिक्षण द्यावे लागत असल्याची गंभीर बाब पाहणीदरम्यान निदर्शनास आली.
CJPच्या शाळा सुधारणा मोहिमेअंतर्गत टीमने किष्ठापूर जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, स्वच्छता तसेच शैक्षणिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत शाळेतील अनेक समस्या समोर आल्या.

संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
शाळेच्या परिसराला संरक्षक भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी परिसरात यापूर्वी साप निघाल्याचे सांगितले. त्यामुळे शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले.
मुला-मुलींसाठी एकच शौचालय
शाळेत मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालयांची सुविधा उपलब्ध नसून एकाच शौचालयाचा वापर करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जात आहे.
खचलेला फ्लोअर; डेस्क-बेंचचाही अभाव
विद्यार्थी बसतात त्या परिसरातील फ्लोअर दबलेला व खचलेला असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक डेस्क-बेंच उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रयोगशाळा व क्रीडा साहित्याचा अभाव
शाळेत प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध नसल्याचे तसेच आवश्यक क्रीडा साहित्याचाही अभाव असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या या सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
शिक्षकांचीही कमतरता
शाळेत आवश्यक संख्येने शिक्षक उपलब्ध नसल्याची बाबही CJPच्या पाहणीत निदर्शनास आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होऊ नये यासाठी शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली.
किचनमध्ये पाणी साचते; अन्नधान्य खराब होण्याची समस्याशाळेच्या किचनची स्थितीही समाधानकारक नसल्याचे पाहणीदरम्यान आढळले.
किचनमध्ये पाणी साचत असल्याने अन्नधान्य खराब होण्याची समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा आणि किचनची दुरुस्ती तातडीने करण्याची आवश्यकता आहे.
गटविकास अधिकारीयांना निवेदन; तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
शाळेतील विविध समस्यांची दखल घेत CJP गडचिरोलीच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती चामोर्शी यांना निवेदन देण्यात आले. शाळेची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
यामध्ये सुसज्ज शाळा इमारत, आवश्यक शिक्षक, संरक्षक भिंत, स्वतंत्र शौचालये, डेस्क-बेंच, प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य, खचलेल्या फ्लोअरची दुरुस्ती, किचनची योग्य व्यवस्था आणि पाण्याचा निचरा या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी CJPकडून करण्यात आली.
CJP टीमचे सदस्य सुरज पिपरे, जावेद खान, कल्पक चंद्रगिरे, पियुष ताटलावार, सक्षम रामटेके, वेदांत काटे, दिलावर साखरे आणि यश गलगट यांनी School Visit करून शाळेतील परिस्थितीची पाहणी केली.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधा मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मंदिरात बसून शिक्षण घेण्याची वेळ येत असेल, तर प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे,” अशी भूमिका CJP टीमच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

