
श्री. अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
तळोधी (बा.)
नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील जंगलालगतच्या शेतात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव रमेश जयराम काशीवार (वय ५५) असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास शेतातील रोपांना पाणी देण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना ठार केले.
सायंकाळपर्यंत ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली.
वृत्त लिहीपर्यंत वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. मृतदेह शेतातच असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे जनकापूर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, जंगलालगतच्या शेतात जातांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

