
“जमीन वाचवा- भविष्य वाचवा”चा बुलंद नारा
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी,दि.४ ॳॉगस्ट :

एमआयडीसीच्या प्रस्तावित भूमी संपादनाविरोधात चामोर्शी तालुक्यातील १४ गावांतील शेतकऱ्यांनी मंगळवार (दि. ४ ऑगस्ट) रोजी अभूतपूर्व एकजूट दाखवत हजारोंच्या उपस्थितीत शांततामय पदयात्रा काढली. शेतकरी कृती समिती (जैरामपूर–येनापूर परिसर) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या विराट पदयात्रेत शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भूमी संपादनाला तीव्र विरोध दर्शविला.
“जमीन वाचवा – भविष्य वाचवा”, “शेती आमचा श्वास, जमीन आमचा विश्वास” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचा निर्धार आणि एकजूट स्पष्टपणे दिसून आली.
सकाळी ११ वाजता लक्ष्मणपूर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. लक्ष्मणपूर–दुर्गापूर–किष्टापूर–चित्तरंजनपूर–येनापूर या मार्गाने संविधानिक, अहिंसक आणि शांततापूर्ण पद्धतीने पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेची सांगता येनापूर येथील मैदानावर झाली. यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदार प्रशांत घोरूडे यांना निवेदन सादर करून प्रस्तावित भूमी संपादन रद्द करण्याची मागणी केली.
या आंदोलनात जैरामपूर, मुधोली चक क्र. २, मुधोली तुकूम, चित्तरंजनपूर, किष्टापूर, येनापूर, दुर्गापूर, सेलूर, लक्ष्मणपूर, गणपूर, विठ्ठलपूर, यादवपल्ली, पारडीदेव तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिक सहभागी झाले. हजारोंच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाने जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले.
यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली की, “जमीन ही आमची ओळख, आमचे अस्तित्व आणि भावी पिढ्यांचे भविष्य आहे. कोणत्याही परिस्थितीत सुपीक शेतीजमीन संपादन होऊ देणार नाही. लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आम्ही न्यायासाठीचा संघर्ष अधिक तीव्र करू.”
या विराट पदयात्रेतून शेतकऱ्यांनी सरकार आणि प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारे कोणतेही निर्णय सहन केले जाणार नाहीत. हक्काच्या जमिनीच्या संरक्षणासाठी लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

