
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून, गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने नक्षल सप्ताहादरम्यान माओवाद्यांनी जंगलात जमिनीत पुरून ठेवलेला अग्निशस्त्रे, आयईडी स्फोटके आणि अन्य साहित्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे सुरक्षा दलांवर मोठा घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा कट उधळून लावण्यात आला आहे.
पोमके बंगाडी हद्दीत राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी अत्यंत सतर्कतेने जंगल परिसराची तपासणी केली. या मोहिमेत एकूण १४ अग्निशस्त्रे, आयईडी स्फोटके तसेच मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले. जमिनीत लपवून ठेवलेला हा शस्त्रसाठा जप्त झाल्याने नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

नक्षलविरोधी कारवाया अधिक तीव्र करत गडचिरोली जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि विकासाचा मार्ग अधिक बळकट करण्यासाठी पोलीस दल आणि सीआरपीएफची संयुक्त मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
“गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून, नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनासाठी कटिबद्ध आहे,” असा संदेशही यावेळी देण्यात आला.

