
चामोर्शी | प्रतिनिधी
चामोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी चामोर्शी येथील मुलीच्या वस्तीगृह परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आदित्य मनोहर कुकडे (वय १८, रा. कुनघाडा, ता. चामोर्शी) याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीच्या ताब्यातून ब्ल्यू रंगाच्या बॅगेत ठेवलेल्या मॅकडॉवेल्स प्रीमियम व्हिस्कीच्या २४ सिल्व्हर टिन, हायवर्ड्स ५००० कंपनीच्या एम.एल.च्या १२ सिल्व्हर टिन, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हिरो फॅशन मोटारसायकल असा एकूण ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ४०७/२०२६ नोंद करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वासुदेव अलोणे करीत आहेत.
या कारवाईमुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर व्यवसायाविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

