
तीन वर्षांपासून मतदारसंघात तयारी करणाऱ्या मंगेशदादांवर अन्याय करू नये – राकेश बेलसरे

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांना मदत मिळवून देत महाराष्ट्रभर आरोग्यदूत म्हणून ओळख निर्माण करणारे मंगेशदादा चिवटे यांनी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी देऊन भाजपने महायुतीचा धर्म पाळावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी केली आहे.

मंगेशदादा चिवटे यांनी गेल्या तीन वर्षांपासून पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात सातत्याने संपर्क वाढवत निवडणुकीची तयारी केली आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली असून, शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सामाजिक आणि सेवाभावी कार्यासोबतच शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या चिवटे यांच्या उमेदवारीला शिक्षक व शिवसैनिकांमध्ये मोठा पाठिंबा असल्याचा दावा बेलसरे यांनी केला.
मात्र, शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून महायुतीमध्ये भाजपला सातत्याने सहकार्य केले जात असताना पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजपकडून स्वतंत्र उमेदवार देण्याची भूमिका घेतली जात असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
“महायुतीच्या सत्तेची समीकरणे मजबूत करण्यासाठी शिवसेनेने अनेक प्रसंगी भाजपला साथ दिली. मग मित्रपक्षाच्या वाट्याची जागा देण्याची वेळ आली की सहकार्याची भूमिका का बदलते?” असा थेट सवाल राकेश बेलसरे यांनी उपस्थित केला.
महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाच्या योगदानाचा विचार करून जागावाटपाचा निर्णय होणे आवश्यक आहे. केवळ पक्षीय विस्ताराच्या दृष्टीने प्रत्येक जागेकडे न पाहता मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि योगदानाचा सन्मान करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेला देऊन मंगेशदादा चिवटे यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार करावे, अशी ठाम मागणी बेलसरे यांनी केली.
गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात संपर्क, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा आणि व्यापक सामाजिक कार्य करणाऱ्या मंगेशदादा चिवटे यांना उमेदवारीपासून डावलणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल, अशी भावना शिवसैनिकांमध्ये आहे. भाजपने मित्रपक्षाचा सन्मान राखत मोठ्या मनाने निर्णय घ्यावा, असेही बेलसरे यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत मिळेल प्रभावी व्यासपीठ
मंगेशदादा चिवटे यांना शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत ठामपणे मांडण्याचा अनुभव आणि सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळाल्यास शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास बेलसरे यांनी व्यक्त केला.
“मंगेशदादांनी तीन वर्षे मतदारसंघात केलेली तयारी, शिक्षकांसाठी घेतलेली भूमिका आणि त्यांचे सेवाभावी कार्य लक्षात घेता त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. महायुतीतील मित्रपक्षाचा सन्मान राखत भाजपने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेला द्यावी आणि मंगेशदादा चिवटे यांना अधिकृत उमेदवारी द्यावी. हाच खरा महायुती धर्म ठरेल,” असे राकेश लक्ष्मणराव बेलसरे यांनी सांगितले.
दरम्यान, मंगेशदादा चिवटे यांच्या उमेदवारीसाठी नागरिक, शिक्षक आणि शिवसैनिकांमध्ये वाढता पाठिंबा दिसून येत असून, आता भाजप नेतृत्व महायुतीच्या समन्वयाला प्राधान्य देत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

