
गुणवत्तेत आघाडीवर असलेल्या विद्यार्थ्याला डावलल्याचा पालकांचा आरोप; चौकशीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव

प्रतिनिधी |भेंडाळा: जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथील इयत्ता ६ वीच्या प्रवेश प्रक्रियेत विसंगती झाल्याचा गंभीर आरोप करत पालक कालिदास पोरटे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. आपल्या पाल्याला प्रवेश परीक्षेत ओव्हरऑल रँक ५३ मिळूनही अंतिम निवड यादीत त्याचे नाव नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, पाल्य पियुष कालिदास पोरटे याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिली होती. परीक्षेत त्याला ओव्हरऑल रँक ५३ मिळाला. मात्र, विद्यालयाने जाहीर केलेल्या अंतिम निवड यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

विशेष म्हणजे, रँक ५३ पेक्षा कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याची निवड झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
गुणवान विद्यार्थ्याला डावलल्याचा आरोप
गुणवत्ता यादीत वरचे स्थान मिळूनही आपल्या पाल्याला प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
पालकांनी स्थानिक विद्यालय प्रशासनाकडे यापूर्वी स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, प्रवेश प्रक्रियेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केवळ संबंधित स्तरावर होणे शक्य नसल्याचे नमूद करत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
तीन प्रमुख मागण्या
पालकांनी आपल्या निवेदनातून पुढील मागण्या केल्या आहेत—
जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथील यावर्षीच्या प्रवेश वाटप व आरक्षण निकषांची तात्काळ चौकशी करावी.
रँक ५३ असलेल्या पियुष पोरटे याला डावलून रँक ५४ असलेल्या विद्यार्थ्याला कोणत्या नियमाच्या आधारे प्रवेश देण्यात आला, याचे स्पष्टीकरण द्यावे.
गुणवंत विद्यार्थ्यावर झालेला अन्याय दूर करून त्याला जवाहर नवोदय विद्यालयात न्याय्य प्रवेश मिळवून द्यावा.
“गुणवंत विद्यार्थ्याला प्रवेशापासून वंचित ठेवणे हा अन्याय असून, या प्रकरणाची वैयक्तिक लक्ष घालून निष्पक्ष चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा,” अशी मागणी पालक कालिदास पोरटे यांनी केली आहे.
या तक्रारीमुळे जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथील प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता, आरक्षण निकष आणि निवड यादीची कार्यपद्धती याबाबत आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

