
वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; मूल तालुक्यात दहशत!
वाघाचा तातडीने बंदोबस्त करा; जखमी गुराख्याला भरीव आर्थिक मदत द्या – प्रशांत गट्टुवार यांची मागणी

न्यूज जागर | चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चेतन कामडे
मूल : मूल तालुक्यातील चिचाळा येथे जंगलात गुरे राखण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात उद्धव मारोती कोठारे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील गुराखी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव कोठारे हे नेहमीप्रमाणे जंगल परिसरात गुरे राखण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. वाघ आणि गुराखी यांच्यात झटापट सुरू असताना सोबत असलेल्या अन्य गुराख्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेतली. आरडाओरड करून वाघाला पळवून लावण्यात त्यांना यश आले. मात्र, वाघाच्या हल्ल्यात उद्धव कोठारे गंभीर जखमी झाले.
जखमी कोठारे यांना तातडीने मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी वनविभागाच्या वाहनाने त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
‘वाघाचा बंदोबस्त करा, अन्यथा नागरिकांच्या जीवाला धोका!’
घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा चिचाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रशांत गट्टुवार यांनी रुग्णालयात उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष चिचापल्ली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या गंभीर घटनेकडे लक्ष वेधले.
“वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा. जंगल परिसरात गुरे राखण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी आक्रमक मागणी प्रशांत गट्टुवार यांनी केली.
तसेच, जखमी उद्धव कोठारे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या उपचारासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी शासन व वनविभागाने जास्तीत जास्त आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
वनविभागाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष..
मूल तालुक्यातील जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरे राखण्यासाठी जंगलात जाणाऱ्या गुराख्यांना संरक्षण मिळावे, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि संभाव्य हल्ले टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आता या घटनेची दखल घेऊन वनविभाग व प्रशासन कोणती ठोस पावले उचलते आणि जखमी गुराख्याला किती आर्थिक मदत मिळते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
….. News Jagar Chandrapur District……

