
लोडशेडिंगमुळे भातपीक करपण्याच्या मार्गावर; अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एल्गार

दोन दिवसांत १२ तास वीजपुरवठा सुरू न झाल्यास १६ ऑक्टोबरला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली चामोर्शी,दि.१३ ऑक्टोबर : एकीकडे पावसाची दडी, दुसरीकडे महावितरणचे लोडशेडिंग आणि त्यातच हातातोंडाशी आलेले भातपीक वाचविण्याची धडपड! या दुहेरी संकटामुळे संतप्त झालेल्या चामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी आणि महिलांनी १३ ऑक्टोबर रोजी चामोर्शी बसस्थानक चौकात एकत्र येत जोरदार चक्काजाम आंदोलन केले. शेतीला २४ तास वीजपुरवठा द्यावा, लोडशेडिंग बंद करावे आणि शेतकऱ्यांचे पीक वाचवावे, अशा मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
■ अवघ्या ३ ते ४ तास वीज; भातपीक वाचवायचे तरी कसे?
चामोर्शी तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भातपिकांसह इतर पिकांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. पावसाअभावी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या माध्यमातून सिंचन करणे अत्यावश्यक बनले आहे.
मात्र, महावितरणच्या वाढत्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी आठ तास असलेले भारनियमन वाढवून १२ तास करण्यात आले आहे. त्यातच शेतीचे आणि गावांचे फीडर वेगळे करण्याचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा आणखी चार ते पाच तास बंद राहत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अवघे तीन ते चार तासच वीज मिळत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
बँकांकडून कर्ज घेऊन, उसनवारी करून आणि दिवस-रात्र मेहनत करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वीज नाही, पाणी नाही आणि पीक वाचविण्याची संधीही हातातून निसटत आहे, अशी व्यथा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मांडली.
■ गडचिरोली जिल्हा लोडशेडिंगमुक्त होता, मग आता भारनियमन का?
दिवंगत आर. आर. पाटील पालकमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याला विजेचा वापर तुलनेने कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर लोडशेडिंगमुक्त ठेवण्यात आले होते, अशी आठवण आंदोलकांनी करून दिली. मग आज त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना का करावा लागत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.
फीडर विभक्तीकरणाचे काम सुरू असले तरी त्याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसता कामा नये. हे काम तूर्तास एक महिना थांबवून शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
■ अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी धाव; १२ तास वीजपुरवठ्याचे आश्वासन
हजारो शेतकरी आणि महिलांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार प्रशांत घोरुडे, महावितरणचे उपविभागीय अभियंता रमाकांत देवगडे आणि पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी महावितरणचे उपविभागीय अभियंता रमाकांत देवगडे यांनी कृषीपंपांसाठी तातडीने १२ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत आश्वासन दिले. तसेच शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मात्र, शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या २४ तास वीजपुरवठ्याबाबत ठोस निर्णय होणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
■ १६ ऑक्टोबरला ठिय्या आंदोलनाचा इशारा; प्रशासनासमोर पेच!
महावितरणने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलकांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. येत्या दोन दिवसांत कृषीपंपांसाठी सुरळीत १२ तास वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही, तर १६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न हा त्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चक्काजामदरम्यान बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आंदोलनकर्त्यांकडून चिवडा आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून माणुसकीचे दर्शनही घडविण्यात आले.
हजारो शेतकरी रस्त्यावर; आंदोलनात प्रमुखांची उपस्थिती
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लिक, सुरेश परसोडे, सुधाकर गदे, करण गण्यारपवार, अमोल (नाना) गण्यारपवार, मधुकर चिंतलवार, राजू आत्राम, गोसाई सातपुते, सुधाकर निखाडे, शामराव पोरटे, पंचरंग मडल, जुगल बारई, रमेश भसारकर, विनोद शेंगर, पंकज दहेलकर, गुरुदास चौधरी, खोजेंद्र सातपुते, सुनील आभारे यांच्यासह तालुक्यातील हजारो महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आता प्रश्न एकच—शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळणार की आश्वासनांवरच समाधान मानावे लागणार? १६ ऑक्टोबरपूर्वी महावितरणने मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास चामोर्शीत पुन्हा शेतकरी आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

