
एटापल्ली : रेगडीगुटा ते झुरी गावाकडे जाणाऱ्या मातीमुरूम रस्त्यावरील नाल्यावर कायमस्वरूपी पूल नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांनी गावात बैठक घेऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडे (CPI) मदतीची मागणी केली. या मागणीला जोर देण्यासाठी नागरिक CPIच्या नेतृत्वाखाली एकत्र आले असून, त्यांच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (MRRDA) आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.

नाल्याला पाणी वाढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध नागरिक तसेच रुग्णांना नाला ओलांडताना अडचणी येतात. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात नेणेही कठीण होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुर्गम व आदिवासीबहुल भागातील या मार्गासाठी केवळ मातीमुरूम रस्ता पुरेसा नसून नाल्यावर पाण्याचा प्रवाह आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मजबूत पूल उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुलाला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) किंवा इतर योग्य शासकीय निधीतून काम मंजूर करावे. तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी तात्पुरती व्यवस्था करावी तसेच कार्यवाहीची लेखी माहिती CPIला देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“गावकऱ्यांनी बैठक घेऊन हा प्रश्न आमच्यासमोर मांडला आणि त्यावर पाठपुरावा करण्याची विनंती केली. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने नाल्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी पुलाचे काम मंजूर करावे,” अशी मागणी कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी केली.
मागणीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही CPIच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनावर कॉम्रेड सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, गडचिरोली तथा राज्य उपाध्यक्ष, ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF), महाराष्ट्र; कॉम्रेड सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य तसेच रेगडीगुटा गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

