
चामोर्शी,दि.७ ऑक्टोबर : शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथील ग्रंथपाल श्री. राजेश्वर मिसार यांच्या प्रदीर्घ २८ वर्षांच्या उल्लेखनीय सेवापूर्तीनिमित्त सत्कार व निरोप समारंभ नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बानबले सर, सहसचिव, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली होते. प्रमुख पाहुणे म्हणून ब्राम्हणवाडे सर व अरुण पाटील मुणघाटे, सदस्य, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली उपस्थित होते. तसेच शाळेचे प्राचार्य डी. आर. चौधरी, उपप्राचार्य शामसुंदर भर्रे , पर्यवेक्षक एम. एस. पुरोहीत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सत्कारमूर्ती राजेश्वर मिसार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी रसिका मिसार तसेच पुत्र डॉ. राम मिसार हेही कार्यक्रमास उपस्थित होते.

राजेश्वर मिसार यांनी आपल्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. आपल्या सेवाकाळात त्यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले असून, समाजाशी असलेली त्यांची बांधिलकी आणि विविध क्षेत्रांतील योगदान विशेष उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी श्री. मिसार यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली व सेवानिवृत्तीनंतरच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शांत, संयमी व कर्तव्यनिष्ठ स्वभावाच्या आठवणींना उजाळा देत सहकाऱ्यांनी भावपूर्ण निरोप दिला.
कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी संचालन डॉ. पंकज नरुले यांनी केले, तर आर. एन. खेवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावनिक आणि आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

