
शेतकरी बचत गटाच्या कर्जवाटपाची रक्कम लंपास; दुचाकीवर ठेवलेली पैशांची बॅग घेऊन चोरटे पसार

नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
चामोर्शी | प्रतिनिधी :

शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी बँकेतून काढून आणलेली तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चामोर्शी शहरात घडली. ‘तुमची शंभर रुपयांची नोट खाली पडली आहे’ अशी बतावणी करून लक्ष विचलित करत साथीदाराच्या मदतीने दुचाकीच्या टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग घेऊन चोरटे फरार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जय गणेश शेतकरी पुरुष बचत गट, लखमापूर-बोरीचे अध्यक्ष घनश्याम बोलीवार आणि सचिव रामचंद्र सत्तरवार हे शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यासाठी चामोर्शी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत आले होते. दुपारी साडेबारा वाजता बँकेतून ५ लाख ५० हजार रुपये काढल्यानंतर दोघेही ही रक्कम बॅगेत ठेवून दुचाकीने निघाले.
बसस्थानक परिसरातील सुमित मेडिकलजवळ ते काही वेळ थांबले. त्यानंतर घनश्याम बोलीवार हे खरेदीसाठी दुकानात गेले, तर रामचंद्र सत्तरवार हे बसस्थानकाकडे गेले. याच संधीचा फायदा घेत एका अनोळखी इसमाने सत्तरवार यांना मागून आवाज देत ‘तुमची शंभर रुपयांची नोट खाली पडली आहे’ असे सांगितले.
नोट पडल्याचे सांगितल्याने सत्तरवार यांनी मागे वळून पाहिले. त्याच क्षणी त्या इसमाच्या साथीदाराने दुचाकीच्या टाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग चोरून पोबारा केला. काही क्षणांतच चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील हालचाली, संभाव्य मार्ग तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या शहरातील वर्दळीच्या परिसरात लाखो रुपयांची चोरी झाल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

