
मूल प्रतिनिधी
पाणीपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही नाही, दिलेली मुदतही उलटली, उत्तराची प्रतीक्षा
मूल

नगरपरिषद मूलच्या प्रभाग क्रमांक ७ मधील अपुरा व अनियमित पाणीपुरवठा तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील स्वच्छता व देखभालीच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्यासाठी नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण उपसभापती सौ. समीक्षा जगदीश कडस्कर यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले होते. मात्र निवेदन देऊन दिलेली मुदत उलटूनही संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही अथवा अधिकृत प्रत्युत्तर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सौ. समीक्षा जगदीश कडस्कर यांच्या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले असूनसुद्धा त्यावर योग्य ती कारवाही करण्यात आली नाही परिणामतः नारू सदृश कृमी नळातून येत असल्याचे चित्र मूळ शहरात बघायला मिळत आहे.
याशिवाय जलशुद्धीकरण केंद्रातील स्वच्छता, गाळ व देखभालीच्या कामांकडेही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त होत असतानाच, आता प्रभागातील एका नळातून ‘नारू’सदृश कृमी आढळल्याचा दावा करण्यात आल्याने पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नळातून आलेल्या पाण्यात असे काही आढळणे ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेची प्रशासनाने तातडीने तपासणी करून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणे, जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी सौ. समीक्षा जगदीश कडस्कर यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देताना ठराविक कालावधीत आवश्यक कार्यवाही करून त्याबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आली होती.* मात्र, दिलेली मुदत संपूनही कोणतीही ठोस कार्यवाही किंवा अधिकृत प्रत्युत्तर मिळाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

‘निवेदन फक्त कागदावरच राहणार का?’
पाणीपुरवठ्यासारख्या नागरिकांच्या मूलभूत गरजेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने पावले उचलणे अपेक्षित असताना, निवेदनावर कार्यवाही न झाल्याने ‘नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रभाग क्रमांक ७ मधील पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याची गुणवत्ता तपासावी, जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता व देखभाल करावी, नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा आणि नळाच्या पाण्यात कथितरीत्या आढळलेल्या ‘नारू’बाबत वस्तुनिष्ठ तपासणी करून नागरिकांना अहवाल द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
नागरिकांच्या समस्येबाबत जागरूक असणाऱ्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण उपसभापती सौ. समीक्षा जगदीश कडस्कर यांनी दिलेल्या निवेदनावरच जर कारवाही होत नसेल तर सामान्य लोकांच्या निवेदनावर प्रशासन कधी लक्ष देणार असा संतप्त सवालही नागरिक करू लागले आहेत
निवेदनाची दखल घेऊन नगरपरिषद प्रशासन आता तरी तातडीने कार्यवाही करणार का आणि नागरिकांना अधिकृत प्रत्युत्तर कधी मिळणार, याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

