शेतीसाठी आवश्यक असलेल्या अनुदानित खतांच्या वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याबरोबरच शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी २५ सप्टेंबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात FFS (Framework For Fertilizer Sale) मोबाईल अॅपद्वारे खत खरेदी-विक्री प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यापुढे अनुदानित खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना FFS अॅपद्वारे किंवा उपलब्ध लिंकच्या माध्यमातून खतांचे बुकिंग करावे लागणार आहे. ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ११ जिल्ह्यांत लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता संपूर्ण राज्यात तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशी असेल खत खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड किंवा स्मार्टफोनमध्ये FFS अॅप डाउनलोड करावे. त्यानंतर Farmer ID किंवा Farmer ID उपलब्ध नसल्यास आधार क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करावे. अॅपमध्ये आपल्या परिसरातील उपलब्ध खत विक्रेत्यांची यादी पाहून आवश्यक खताची निवड करून बुकिंग करता येईल. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर QR कोड जनरेट होईल. बुकिंगनंतर निर्धारित कालावधीत संबंधित विक्री केंद्रावर हा QR कोड, आधार कार्ड आणि लिंक असलेला मोबाईल घेऊन जावे लागेल. विक्रेत्याच्या POS मशीनवर QR कोड स्कॅन केल्यानंतर खत विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेतकऱ्याला स्वतः विक्री केंद्रावर जाणे शक्य नसल्यास बुकिंगच्या वेळी प्रतिनिधीची नोंदणी करून त्याच्या माध्यमातून खत घेता येणार आहे. अशावेळी प्रतिनिधीने आधार कार्ड व मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे. खत खरेदीवर मर्यादा शेतकऱ्यांना बुक केलेल्या खतांपैकी आवश्यकतेनुसार कमी प्रमाणात खत घेण्याची मुभा राहणार आहे. DAP खतासाठी हेक्टरी २ बॅग आणि युरिया खतासाठी हेक्टरी ५ बॅग अशी खरेदीची मर्यादा आहे. इतर खते आवश्यकतेनुसार खरेदी करता येणार आहेत. POS मशीनवर विक्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर POS स्लिप मिळणार असून, त्याआधारे विक्रेत्याने खरेदी बिल देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी POS स्लिप आणि खरेदी बिल अवश्य घ्यावे व त्यानुसारच रक्कम अदा करावी. २३ सप्टेंबरला सावलीत प्रशिक्षण FFS प्रणालीद्वारे खत विक्रीची प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी २३ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती सभागृह, सावली येथे सर्व अनुदानित खत विक्रेते तसेच संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांच्याशी संपर्क साधावा. तक्रारी असल्यास ग्रामपंचायतीच्या दक्षता समितीकडे किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. साठेबाजी व काळाबाजाराला आळा बसण्याची अपेक्षा FFS प्रणालीमुळे खतांची साठेबाजी, जादा दराने विक्री आणि लिंकिंगसारख्या प्रकारांना आळा घालण्यास मदत होऊन खत वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी विक्री केंद्रांवर तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार आहे.