
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी):चवडेश्वरी गणेश मंडळातर्फे चामोर्शी येथे नुकतेच एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील सर्व घटकांना आरोग्याची सुविधा व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष साहिल पेशटीवार, उपाध्यक्ष श्रावण चौधरी आणि सचिव अभिषेक कोत्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.आरोग्य तपासणीत नागरिकांचा सहभाग:

या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण ५७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात बीपी (रक्तदाब) तपासणी, शुगर तपासणी, एचबी (HB), सीबीसी (CBC) तपासणी, मलेरिया तपासणी, तसेच संपूर्ण रक्ततपासणी आणि इतर आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे योगदान:
आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय व आरोग्य पथकाचे मोठे योगदान लाभले. यामध्ये डॉ. रुपाली बांडगे, ताई उईके (आरोग्य सेविका), तुषार मंगेर (मा. सेवक), पितांबर मेश्राम, सपना येरमे, मिलिंद बन्सोड आणि संगीता यांनी सेवा दिली.
मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे चामोर्शी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांचे वारंवार आयोजन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

