
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी|
गडचिरोली (चामोर्शी) | प्रतिनिधी : कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. कृषी विभागातील प्रस्तावित अतांत्रिक आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी या निर्णयाची घोषणा केली.
अतांत्रिक आकृतीबंध रद्द करण्याच्या मागणीसाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे विविध टप्पे राबविले. यामध्ये लॅपटॉप शासनाकडे जमा करणे, शासकीय सिमकार्ड परत करणे तसेच पुणे येथील कृषी आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन अशा विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी आपले लॅपटॉप व सिमकार्ड कार्यालयात जमा करून आंदोलनाला ठोस पाठिंबा दिला. अखेर शासनाने मागणी मान्य केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषी संघटनेचे पदाधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी प्रदीप मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने अतांत्रिक आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन यशस्वी झाले असून, आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कृषी विभाग सदैव तत्पर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातील १४,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सुमारे ४ कोटी ५० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शासनाच्या निर्णयामुळे कर्मचारी संघटनांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

