
गडचिरोली (झिंगानूर): जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा झिंगानूरच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाला गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दर शनिवारी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी व अनुभवाधारित शिक्षण दिले जात आहे.
याच उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील चार अंगणवाडी केंद्रांना भेट देत चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत आनंददायी अध्यापन कार्य केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी अंगणवाडीतील बालकांसोबत विविध शैक्षणिक खेळ, गाणी, गोष्टी, कृती व मनोरंजक उपक्रम घेतले. त्यामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या उपक्रमातून मोठ्या विद्यार्थ्यांना नेतृत्व, संवादकौशल्य, सहकार्य व सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली, तर अंगणवाडीतील बालकांना खेळता-खेळता शिकण्याची संधी मिळाली. शाळा आणि अंगणवाडी यांच्यातील शैक्षणिक समन्वय वाढविणारा हा उपक्रम विशेष ठरत आहे.

‘शिकताना आनंद आणि शिकवताना समाधान’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

