
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; जिल्ह्यातील खेळाडूंना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचे बळ
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक-२ अंतर्गत विविध विकासकामांसाठी तब्बल ८० कोटी १२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून ग्रामीण व दुर्गम भागातील खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री व क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी सातत्याने मागणी लावून धरली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाला गती देत मंत्रिमंडळ बैठकीत निधी मंजुरीचा मार्ग मोकळा केला.

या प्रकल्पासाठी क्रीडा सचिव रणजितसिंह देओल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाटे तसेच कन्सल्टंट सुधीर श्रीवास्तव यांनीही प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.
अत्याधुनिक क्रीडा सुविधांनी सजणार संकुल
क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक-२ अंतर्गत खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये ४०० मीटर सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल, खेळाडूंसाठी सुसज्ज वसतिगृह, आधुनिक क्रीडा साहित्य, प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी, मजबूत कंपाऊंड वॉल यांसह विविध पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
क्रीडा संकुलाचे अर्ध्याहून अधिक काम यापूर्वीच पूर्ण झाले असून उर्वरित कामांना या निधीमुळे मोठी गती मिळणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने संकुलाच्या विकासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
दुर्गम भागातील खेळाडूंना मिळणार व्यासपीठ
गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण व दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात क्रीडा गुणवत्ता असूनही योग्य प्रशिक्षण व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक खेळाडूंना मर्यादा येत होत्या. नव्या क्रीडा संकुलामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना सराव, प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहेत.
विशेषतः दुर्गम व आदिवासीबहुल भागातील युवकांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गडचिरोलीचे खेळाडू चमकतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल
८० कोटी १२ लाख रुपयांच्या निधीची मंजुरी ही केवळ क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठीची आर्थिक तरतूद नसून गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. या अत्याधुनिक क्रीडा संकुलामुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आपल्या प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्यासाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

