
श्री. नंदकिशोर वैरागडे. विशेष जिल्हा प्रतिनिधी. गडचिरोली
कोरची तालुक्यातील पडियालजोब-डाबरी गावकऱ्यांचे श्रमदानातून पुलाच्या दुरुस्तीचे काम; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप
कोरची तालुक्यातील मसेली येथून पडियालजोब व डाबरी या गावांकडे जाणारा सुमारे ७ किलोमीटरचा रस्ता मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने दोन्ही गावांतील नागरिकांसह शाळकरी मुला-मुलींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता व पुलाची दुरवस्था झाल्याने दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला होता.

या समस्येबाबत ग्रामस्थांनी कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डम यांना निवेदन देऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तहसीलदारांनी संबंधित विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेशही दिले. मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दुरुस्ती करण्याऐवजी गावातील नागरिकांना ‘₹५०० देतो, तुम्हीच रस्त्यावर पडलेला खड्डा दुरुस्त करून घ्या’, असे सांगितल्याचा आरोप आहे.
तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशानंतरही प्रत्यक्ष काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अखेर ग्रामसभा पडियालजोब आणि डाबरीने सामूहिक निर्णय घेतला आणि आज दोन्ही गावांतील महिला, पुरुष, युवक तसेच नागरिक एकत्र येत श्रमदानातून पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
सरकारी यंत्रणेची वाट पाहत बसण्याऐवजी ग्रामस्थांनी स्वतःच फावडे, घमेले हातात घेऊन रस्ता व पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या रस्त्याचे खडीकरण करून त्यानंतर डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वीच खासदार, आमदार तसेच शासनाकडे निवेदने देऊन मागणी केली आहे. मात्र, वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, तरीही प्रशासन शांत?
पावसाळ्यात रस्ता वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रुग्ण, वृद्ध, महिला आणि शेतकऱ्यांनाही या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे प्रशासनाला आरसा दाखवला असून, ज्या कामासाठी शासनाच्या यंत्रणेने पुढाकार घ्यायला हवा होता, ते काम अखेर गावकऱ्यांनाच आपल्या हाताने करावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
पडियालजोब आणि डाबरी ग्रामस्थांची मागणी आहे की, केवळ तात्पुरती डागडुजी न करता मसेली ते पडियालजोब-डाबरी या संपूर्ण रस्त्याचे कायमस्वरूपी खडीकरण व डांबरीकरण करून पुलाचीही मजबूत दुरुस्ती करण्यात यावी.

