
श्री. नंदकिशोर वैरागडे. विशेष जिल्हा प्रतिनिधी. गडचिरोली
भुनकाशावर झळकल्याने शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा
फॉर्मर आयडी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीची अडचण दूर; ऑनलाईन सातबारा-नकाशा आता उपलब्ध

*गडचिरोली, दि. 18 :*
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या *नवीन लाडज* या पुनर्वसित गावाला अखेर अधिकृत ओळख मिळाली आहे. तालुका भूमी अभिलेख विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे हे गाव आता शासनाच्या *भुनकाशावर* झळकले असून महाभूमी वेबसाइटवर त्याचा स्वतंत्र नकाशा ऑनलाईन दिसणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील जुन्या लाडजमधील पूरग्रस्तांचे १९६१-६२ मध्ये गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायतीत “नवीन लाडज” या नावाने पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र तब्बल ६४ वर्षे या गावाला महसुली दर्जा नव्हता.
३ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन लाडज वाडीचे गावात रूपांतर करण्याची अधिसूचना काढली. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने गावकरी अडचणीत होते. गावकऱ्यांच्या ९ जानेवारी २०२५ पासूनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर १७ सप्टेंबरला जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी गावाला व्हिलेज कोड बहाल केला.
स्वतंत्र नकाशा नसल्यामुळे नवीन लाडजमधील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून *फॉर्मर आयडी आणि ॲग्रीस्टॅक* नोंदणीमध्ये मोठ्या अडचणी येत होत्या. आज दि. १८ पासून गाव भुनकाशावर आल्याने आता शेतकऱ्यांना ऑनलाईन नकाशा, सातबारा, महसुली पुरावे आणि खरेदी-विक्रीसाठी दरपत्रक सहज उपलब्ध होणार आहे.
भूमी अभिलेख विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता प्लॉट रिपोर्टमध्ये सर्वे नंबर, धारकाचे नाव, खाता क्रमांक आणि चतु:र्सिमा स्पष्टपणे दिसणार आहे.
हे गाव महाभूमी वेबसाइटवर आणण्यासाठी देसाईगंज तालुका भूमी अभिलेख विभागाचे अभिलेखापाल *तन्मय फेंडर*, छानणी लिपिक *राजेश सहारे* आणि निमतांदार *मनोज दांडवे* यांनी विशेष मेहनत घेतली. जिल्हा अधीक्षक *श्री. विजय भालेराव* यांच्यामार्फत प्रस्ताव पुण्याच्या जमाबंदी आयुक्तांकडे पाठवून मान्यता मिळवण्यात आली.
याबाबत माहिती देताना *तालुका भूमी अभिलेख उप अधीक्षक श्री. मुकेश सेलोकर* म्हणाले,
_”शासनाच्या महाभुनकाश वेबसाइटवर नवीन लाडज गाव अधिकृतपणे आलेला आहे. या गावाला ओळख मिळवून देण्यासाठी आमच्या टीमने अथक परिश्रम घेतले. आता गावकऱ्यांना सर्व महसुली सुविधा एका क्लिकवर मिळतील.”_
नवीन लाडज गाव भुनकाशावर आल्यानंतर मिळणारे फायदे:
1. फॉर्मर आयडी व ॲग्रीस्टॅक नोंदणी सुलभ
2. ऑनलाईन 7/12, नकाशा आणि प्लॉट रिपोर्ट उपलब्ध
3. जमीन खरेदी-विक्री व कर्जासाठी महसुली पुरावे तयार

