
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व पोलीस अधीक्षक एम. रमेश यांची रात्री पाहणी; अतिक्रमण, वाहतूक व्यवस्थापनाचाही घेतला आढावा
गडचिरोली, दि. १८ ॶॉगस्ट : ‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानाच्या विकास व संवर्धन कामांना आता अधिक गती मिळणार आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासमवेत मार्कंडा देवस्थान परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू असलेली कामे कोणत्याही परिस्थितीत येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी एमएसआरडीसी तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत (एएसआय) सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची प्रगती, प्रलंबित बाबी आणि कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत त्यांनी प्रत्येक कामाचे योग्य नियोजन करून गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर
एमएसआरडीसीच्या अखत्यारितील विकासकामांचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित कामांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले. उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामग्रीचा योग्य वापर करून कामांना गती द्यावी आणि निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले. डिसेंबरपर्यंत एमएसआरडीसीची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कृती आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
एएसआयच्या कामांचीही पाहणी
मार्कंडा देवस्थानाच्या ऐतिहासिक व पुरातत्त्वीय महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचीही जिल्हाधिकारी पंडा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. कामांची सद्यस्थिती, झालेली प्रगती आणि पुढील नियोजनाबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. देवस्थान परिसराच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करत विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अतिक्रमणाचा प्रश्न संवादातून सोडविण्याच्या सूचना
मार्कंडा परिसरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावरही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांशी समन्वय साधून त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि पर्यायी व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
वाहतूक व्यवस्थापनावरही विशेष लक्ष
देवस्थान परिसरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी परिसरातील वाहतूक व्यवस्था, वाहनांची ये-जा तसेच गर्दीच्या काळातील नियोजनाबाबत चर्चा केली. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना दिल्या.
समन्वयातून मार्कंड्याचा विकास साधणार
मार्कंडा देवस्थान परिसरातील विकास, संवर्धन आणि पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा. कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी दिले.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या या पाहणीमुळे मार्कंडा देवस्थानाच्या विकासकामांना नव्या गतीची अपेक्षा निर्माण झाली असून, डिसेंबरपर्यंत एमएसआरडीसीची कामे पूर्ण करण्याच्या निर्देशामुळे भाविक व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

