
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि. १७ ऑगस्ट :हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा तसेच भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिवसेना नेते तथा सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाला जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी, जिल्हाप्रमुख पवन गेडाम, नागपूर महानगर संपर्कप्रमुख सतीश हारडे, सहसंपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत बनसोड, अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम, नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, युवासेना विस्तारक शुभम सोरते, जिल्हा संघटक विलास ठोंबरे, तालुका संघटक नंदू कुमरे, गडचिरोली शहरप्रमुख पप्पू भाऊ शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासोबतच आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचा विचार आणि संघटन जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने आणि घोषणांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. मेळाव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

